आठवलेंना मारहाणीचा आरपीआय कडून औरंगाबादेत निषेध

Foto

औरंगाबाद- अंबरनाथ येथील विमको नाका परिसरात रिपाइंच्या वतीने आयोजित संविधान गौरव कार्यक्रमात प्रविण गोसावी या तरुणाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री खासदार रामदास आठवले यांना मारहाण केली. यावर आठवलेंना मारहाण करणाऱ्या प्रविण गोसावीला कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप देऊन त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रभर पडले असून औरंगाबादेतही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.  या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रिपाईने या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. 

 

यासंदर्भात  रिपाई आठवले गटाचे राज्य उपाध्यक्ष मिलिंद शेळके यांनी या घटनेचा तीव्र संतापात निषेध व्यक्त केला. सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे आमचे राष्ट्रीय नेते आहेत आणि त्यांच्यावर हल्ला करणे हि निषेधार्ह बाब आहे. सदरील घटनेत दोषी असणारा प्रवीण गोसावी याच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करून निवेदन देणार आहोत. तर राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम म्हणाले कि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लढणारे रामदास आठवले हे कायम कार्यकर्त्याच्या आणि नागरिकांच्या मध्ये असतात आणि त्या ठिकाणी अशा स्वरूपाच्या घटना घडतात हि अत्यंत निंदनीय बाब आहे. तर रिपाईचे मराठवाडा युवक अध्यक्ष नागराज गायकवाड म्हणाले की, हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट असून देशाच्या वरिष्ठ मंत्र्यांवर हल्ल्याचा प्रयत्न होणे गंभीर बाब आहे. त्यामुळे आरोपीवर तात्काळ  कडक कारवाई करावी.

 

बाबुराव कदम, मिलिंद शेळके, विजय मगरे, श्रावण गायकवाड, मधुकर चव्हाण, रवी जवळ, प्रकाश गायकवाड, प्रशांत शेगावकर, अरविंद अवसारमल घडलेल्या घटनेबाबत निषेध व्यक्त केला आहे.